
केमिकल कंपनी शेजारी असल्याने वाढली होती धोक्याची तीव्रता; जवानांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण
जळगाव ( प्रतिनिधी ) :- जळगाव एमआयडीसी मधील एल सेक्टर परिसरातील लल्लन यादव यांच्या कुलर निर्मिती कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीत कुलर निर्मितीसाठी वापरण्यात येणारे वाइंडिंग मोटर, गवत, लोखंडी पट्ट्या तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. कंपनीच्या शेजारीच केमिकल कंपनी असल्याने मोठा स्फोट अथवा गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.


आगीची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिका अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच गेंदालाल मिल येथील अग्निशमन वाहनानेही मदतीसाठी सहभाग घेतला. अग्निशमन जवानांनी संपूर्ण आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली व पूर्णपणे विझविली.
ही कारवाई मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे तसेच केंद्र अग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जवानांनी धोकादायक परिस्थितीत शर्थीचे प्रयत्न करून आग शेजारील परिसरात पसरण्यापासून रोखली.
अग्निशमन जवानांचे मोलाचे योगदान
आग विझविण्याच्या मोहिमेत वाहन चालक देविदास सुरवाडे, संजय भोईटे, युसुफ पटेल, प्रभाकर पाटील, शोएब तडवी आणि मयूर देसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच फायरमन ललित पाटील, संजय तायडे, यश मनोरे, वृषभ सुरवाडे, सुमित साळवे, जगदीश साळुंखे, शिवा तायडे, संदीप कोळी, सरदार पाटील, नितीन राठोड, रितेश उबाळे आणि शुभम पाटील यांनी धाडसाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
वेळीच नियंत्रणामुळे मोठे नुकसान टळले
आगीमुळे कंपनीतील साहित्याचे नुकसान झाले असले तरी अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे आग केमिकल कंपनीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनीही अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले.
“अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या तत्परतेमुळे परिसर सुरक्षित राहिला,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.








