आर. आर. शाळेजवळ रात्री कोसळलेले निंबाचे झाड हटवले

अग्निशमन विभागाची तत्पर कारवाई, वाहतूक सुरळीत!
जळगाव : शहरातील आर. आर. शाळेजवळ ताहेर ट्रान्सपोर्ट परिसरात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास एक जुने व मोठे निंबाचे झाड अचानक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. आज रविवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि महापालिकेचे पर्यावरण अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या कटरच्या साहाय्याने कापून रस्त्याच्या बाजूला केल्या आणि मार्ग पूर्णपणे मोकळा केला. वाहनचालक मयूर ओतारी यांच्यासह फायरमन संजय तायडे, किरण पाटील आणि रुपेश पाटील यांनी या मदतकार्यात मोलाची भूमिका बजावली. अग्निशमन विभागाने वेळेवर केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील विस्कळीत झालेली वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.









