वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा विहिरीत मृतदेह आढळला
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील वड्री येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शनिवारी गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर उर्फ गफ्फार इस्माईल तडवी (वय ४५, रा. वड्री, ता. यावल) हे गुरुवारी दुपारी घरातून बाहेर पडले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या पत्नीने याबाबत नातेवाईकांनाही माहिती दिली होती.
दरम्यान, शनिवारी गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील बाळकृष्ण सदाशिव यांच्या शेतातील विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख सिकंदर उर्फ गफ्फार तडवी अशी पटली.
मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









