
पाचोरा ( प्रतिनिधी ) :- तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर रविंद्र कोळी (वय १७ वर्षे ११ महिने २४ दिवस, रा. खेडगाव नंदीचे, ता. पाचोरा) हा ६ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा परिसरात शोध घेतला. मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
मुलाचे वडील रविंद्र कडुबा कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलाला फूस लावून अथवा पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार पाचोरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर करीत आहेत.









