
मुंबई (प्रतिनिधी) – केंद्रीय निवडणूक आयोग आता राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे. तशी नोटीस आयोगाने पाठवली आहे. शिवसेनेला धक्का देणारे निवडणूक आयोग आता राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणार काय ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.



राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवणे गरजेचे असते. त्याचबरोबर लोकसभेत ११ जागा मिळवणे गरजेचे असते. निवडणूक आयोगाने २०१९ ला लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीप्रमाणेच सीपीआय आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्व समिक्षेखाली आलं होतं. पण त्यावेळेस कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीला समाधानकारक उत्तर देता आले नाही तर राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह जावू शकते.
तसे झाले तर राष्ट्रवादीला इतर राज्यांमध्ये पुढच्या निवडणुका घड्याळ या त्यांच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढता येणार नाही. दरम्यान राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यास राजकीय पक्षांना अनेक फायदे मिळतात. सर्व राज्यांमध्ये त्यांना एकाच चिन्हावर निवडणूक लढण्यात येते. तसंच दिल्लीमध्ये राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयाला जागा दिली जाते. राष्ट्रवादीला महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून दर्जा असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवता येणार आहे. राष्ट्रवादीने नुकत्याच झालेल्या नागालँड विधानसभेच्या निवडणूकीत ७ जागा जिंकल्या होत्या. पण इतर ठिकाणी मात्र सुमार कामगिरी झाली होती.
