घोडगाव येथील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
चोपडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोडगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, घोडगाव येथील रहिवासी सुनील रामकृष्ण कोळी (वय ४१) यांच्या घरात ३० मे रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५.३० वाजेदरम्यान चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घराच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाट व स्टील बॉक्समध्ये ठेवलेले मौल्यवान ऐवज चोरून नेला.
चोरीस गेलेल्या मुद्देमालात सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने, २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ हजार रुपये किमतीची चांदीची देवमूर्ती तसेच ५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
चोरट्यांनी रोख रक्कम व दागिन्यांसह बँकेचे धनादेश, काही महत्त्वाची कागदपत्रे आणि देवघरातील चांदीची मूर्तीही चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.








