
जळगाव (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील भातखंडे ते उत्राण दरम्यान तरुणाच्या झालेल्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुंबईच्या स्वामी टोळीच्या दोघांना अटक केली आहे. तर एकास ताब्यात घेतले. टोळीच्या सदस्यांना अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. हा यशस्वी तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कासोदा पोलिसांनी केला.



वाळूमाफियांच्या अंतर्गत स्पर्धेतून एक महिन्यापूर्वी सचिन पाटील याने नीलेश देसले याला जबर जखमी केले होते. याचा बदला घेण्यासाठी नीलेश देसले याने मुंबईच्या स्वामी टोळीला सचिनच्या हत्येची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाळत ठेवून सचिन पाटील याच्या बुलेटला बोलेरोने धडक देत नंतर चाकूने खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.
सचिन आणि नीलेश देसले यांचा वाळूचा व्यवसाय आहे. ठेका मिळाला, तर कायद्याने, नाही तर बेकादेशीर उपसा करून दोघांनी वाळू व्यवसायात जम बसविला होता. महिनाभरापूर्वी दोघांमध्ये हाणामारी होऊन सचिनने नीलेश याचा एक पाय फ्रॅक्चर केला होता. नीलेशने स्वामी टोळीशी संपर्क करून श्रीनिवास स्वामी याला सचिनच्या खुनाची सुपारी दिली. सचिनचा खून करण्यासाठी स्वामी टोळीचे गुंड १५ दिवसांपूर्वीच पाचोऱ्यात थांबले होते. आठ-दहा दिवस पाहणी केल्यानंतर ते निघून गेले. मात्र, समाधान पाटील, शुभम पाटील आणि सागर कोळी यांना पाळतीवर ठेवले होते.
नीलेशची जीप त्यांच्या सोबत होती. रविवारी (ता. १९) सचिन नेहमीप्रमाणे पहाटे गिरणा नदीवर वाळूच्या कामाची लाईन लावून परतत असताना, श्रीनिवास स्वामी याला भ्रमणध्वनीवरून तो निघाल्याची टीप दिली. त्यावरून त्यांनी सचिनचा खून केला व जिपने पळ काढला. मुंबईच्या टोळीने गुन्ह्यात वापरलेली जीप कानळदा रस्त्यावर सोडून पळ काढला. गुन्हे शाखेच्या पथकाने जीप व शस्त्र जप्त केली असून, तिच्यावर मालेगाव पासिंगची नंबर प्लेट लावली होती. चेसिस नंबरवरून ती गाडी नीलेश देसले याची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी समाधान पाटील व शुभम पाटील यांना अटक केली असून, दोघांना २३ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. सागर कोळी याची चौकशी सुरू आहे. तर मुंबईच्या टोळीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.
