“जीएमसी’ मधील शल्यचिकित्सा विभागाचे यश
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील एका रुग्णावर व्हेरिकोज व्हेन्सच्या आजाराबाबत शल्यचिकित्सा विभागात यशस्वी उपचार झाले. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून वीस वर्षांपासून दुखरी नस काढून टाकत रुग्णाला दिलासा मिळाला आहे. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी वैद्यकीय पथकाचे कौतुक केले आहे.
जळगाव शहरातील रामनगर परिसरातील ५५ वर्षीय रहिवासी शिवाजी पाटील यांना डाव्या पायाला व्हेरिकोज व्हेन्समुळे पायी चालता येत नव्हते. गेल्या वीस वर्षांपासून राज्यातील अनेक दवाखाने फिरून झाले. खाजगी दवाखान्यात तर चार लाख रुपये खर्च सांगितला. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने शिवाजी पाटील अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले. तेथे शल्यचिकित्सा विभागात डॉ. रोहन पाटील, डॉ. महेंद्र मल यांनी वैद्यकीय तपासणी करून त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते रुग्णालयात दाखल (ऍडमिट) झाल्यावर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रियादरम्यान त्यांना व्हेरिकोज व्हेन्स काढून दिलासा देण्यात आला. शस्त्रक्रिया डॉ. रोहन पाटील, डॉ. महेंद्र मल यांनी केली. त्यांना डॉ. हर्षा चौधरी, डॉ. स्नेहा वाडे, डॉ. सुनील गुट्टे यांनी सहकार्य केले. उप अधिष्ठाता तथा शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. मारोती पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. उपचाराकामी परिचारिका तुळसा माळी, सुरेखा महाजन यांचे सहकार्य मिळाले. रुग्णाला बरे करून दिलासा दिल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी वैद्यकीय पथकाचे कौतूक केले आहे.