कामकाजात पारदर्शकता व खटल्यांचा जलद निपटारा
जळगाव (प्रतिनिधी) : – जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग लवादाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कामकाजाची कार्यपध्दती जाहीर केली आहे. अशा प्रकारची कार्यपध्दती जळगाव जिल्हा लवादासाठी प्रथमच जाहीर झाली आहे. यामुळे कामकाजात पारदर्शकता येऊन खटल्यांचा जलद निपटारा होणार असून लवाद प्रशासन गतिमान होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६ अन्वये जिल्हाधिकारी जळगाव यांची लवाद, राष्ट्रीय महामार्ग म्हणून नियुक्ती केलेली आहे. लवाद आणि सामंजस्य कायदा१९९६ मधील तरतुदीनुसार लवादास त्यांच्यासमक्ष चालविण्यात येणाऱ्या लवाद प्रकरणी स्वतःची कार्यपद्धती निश्चित करण्यासंबंधीचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या अधिकारांचा वापर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कार्यपध्दती जाहीर केली आहे.
लवाद कक्ष
राष्ट्रीय महामार्गासाठीच्या भूसंपादनासंदर्भात लवाद अर्ज दाखल करावयाचा असल्यास तो अर्ज जिल्हाधिकारी जळगाव तथा लवाद, राष्ट्रीय महामार्ग यांच्या कार्यालय कार्यान्वित असलेल्या लवाद कक्षामध्ये टपाल शाखेमार्फत दाखल करून घेण्यात येईल. लवाद कक्षाचे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय परीसरातील इमारतीतील लवाद कक्षामधून चालविण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणे लवाद अर्ज दाखल करून घेणे, त्या अर्जाची छाननी करून नोंदवून घेणे व त्यास नोंदणी क्रमांक देणे, लवाद अर्ज वेळोवेळी लवाद तथा जिल्हाधिकारी राष्ट्रीय महामार्ग यांच्या समक्ष सुनावणीसाठी सादर करणे व लवाद, राष्ट्रीय महामार्ग यांच्या आदेशाप्रमाणे सर्व लवाद अर्जामध्ये वेळोवेळी यथायोग्य कायदेशीर कार्यवाही पार पडण्याची जबाबदारी लवाद कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर राहील.
लवादाच्या सुनावणीचे ठिकाण व वेळ
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथील न्यायदालनात सदर परिपत्रकाच्या क्र.४ मधील xi आणि xil मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रकरणी तशी सुनावणीची नोटीस दिल्यानंतर दर महिन्याच्या प्रत्येक पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी सकाळी ११ वाजता लवाद प्रकरणी सुनावणीची कार्यवाही करण्यात येईल. लवाद अर्जाचे कामकाज प्राधान्याने मराठी भाषेतून चालविण्यात येईल.