पाचोरा (प्रतिनिधी):- पाचोरा ते माहेजी रेल्वे स्थानकादरम्यान परधाडेजवळ एका अज्ञात ३५ वर्षीय इसमाचा रेल्वे अपघातात जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पाचोरा रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक प्रदीपकुमार यादव यांनी पोलिसांना या घटनेची खबर दिली. परधाडे ते माहेजी रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या खांब क्रमांक ३७८/१८ जवळ अप आणि डाऊन रेल्वे लाईनवर एक अज्ञात पुरुष मृत अवस्थेत पडलेला रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळून आला.
रेल्वे रुळ ओलांडताना एखाद्या धावत्या ट्रेनची जोरदार धडक बसल्यामुळे किंवा चालत्या रेल्वेतून पडल्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे प्रशासनाने आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे असून, अंगात साधारण कपडे आहेत. त्याच्याजवळ ओळख पटवणारे कोणतेही कागदपत्र किंवा मोबाईल मिळून आलेला नाही. रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (PI) राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजि. नं. ५५/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान उमाडे करत आहेत.
ओळख पटवण्याचे आवाहन: सदर वर्णनाचा अथवा या वयोगटातील कोणताही पुरुष परिसराबाहेरून बेपत्ता असल्यास किंवा या मृत व्यक्तीबाबत काहीही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने पाचोरा पोलीस स्टेशन किंवा तपास अंमलदार भगवान उमाडे (मोबाईल क्र. ९०४९०७३९९६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









