जळगाव महापालिकेचा ‘समर्पण’ संस्थेसोबत स्तुत्य उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहराला लाभलेली समृद्ध धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपत, शहरातील विविध मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या निर्माल्याचे शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक व्यवस्थापन करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडून ‘समर्पण’ संस्थेच्या संयुक्त सहकार्याने शनिवार दि. १६ मे रोजी “निर्माल्य संकलन व व्यवस्थापन प्रकल्प” कार्यान्वित करण्यात आला. या अभिनव उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा’ निर्माल्याचे पावित्र्य जपत, गोळा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प राबवणार आहे. यासाठी आवश्यक नियोजन, जनजागृती, संकलन व प्रक्रिया व्यवस्थापनात ‘समर्पण’ संस्था महापालिकेला पूर्णतः सहकार्य करत आहे.

या मोहिमेसाठी जळगाव महानगरपालिकेच्या वतीने विशेष ‘निर्माल्य संकलन रथ’ उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात रथ चौक येथील ऐतिहासिक व प्राचीन श्रीराम मंदिर संस्थान येथे या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते या विशेष निर्माल्य रथाचे पूजन करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी शहरातील स्थानिक नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके, सुनील खडके, स्थायी समिती सदस्य कल्पेश सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, पियूष कोल्हे अमित काळे, स्वीकृत नगरसेवक नरेंद्र सोनवणे, हर्षल मावळे, तसेच माजी नगराध्यक्ष बंडूदादा काळे, महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त उदय पाटील आणि या प्रकल्पासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘समर्पण’ संस्थेच्या चेतना नन्नवरे, पोलीस प्रभाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय वानखेडे, संदीप ढंढोरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक रमेश कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्माल्य रथ श्रीराम मंदिर संस्थान येथून जुने जळगावातील विठ्ठल मंदिर आणि पुढे इतर मंदिरांसाठी मार्गस्थ झाला.
प्रकल्पाचे उद्दिष्ट आणि महत्त्व
मंदिरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर गोळा होणारे निर्माल्य अनेकदा नदी-नाल्यांमध्ये किंवा कचऱ्यात फेकले जाते, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते. निर्माल्याचे पावित्र्य राखत त्याचे उपयुक्त सेंद्रिय खतात रूपांतर करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. महापालिकेचा हा संकलन रथ नियमितपणे निर्माल्य गोळा करणार असून, नागरिकांनी आणि मंदिर प्रशासनाने आपले निर्माल्य इतरत्र न टाकता मंदिरातच जमा करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.








