शिवसेना ठाकरे गटातर्फे निवेदन देत आंदोलनाचा इशारा
जामनेर (प्रतिनिधी) – वैद्यकीय शिक्षण विभागाचे राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याच मतदारसंघात रुग्णांना सुविधा मिळत नाहीए. याबाबत जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात युवासेना-शिवसेना उबाठा गटाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय सोनवणे यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचला. तसेच, उपजिल्हा रुग्णालयात घाणीचे साम्राज्य असून ८ दिवसात समस्या सुटल्या नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटातर्फे देण्यात आला आहे.
जामनेर तालुक्याचे नाव आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या आरोग्य सेवेच्या कामाने ओळखले जाते. आरोग्य सेवेच्या नावाखाली जनतेचा मलिदा खाण्याचे काम गेल्या 30 वर्षांपासून चालू आहे. आज त्यांच्याच तालुक्यामध्ये आरोग्य सेवेचा सत्यानाश सुरु आहे, असा आरोप युवासेना शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. ३० वर्षे या जामनेर तालुक्याचे आमदार आहेतं.परंतु या तालुक्यातील सामान्य जनतेसाठी सुविधाच नाही.
जामनेरच्या शासकीय रुग्णालयात आज असंख्य समस्या आहेत. सोनोग्राफी मशीन नाही. एक्स-रे काढण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. रुग्णांची ओपीडी दिवसातून एकचं वेळा होते.रक्त तपासणी झाल्यानंतर वेळेवर रिपोर्ट मिळत नाही. उपजिल्हा रुग्णालय असून ब्लड बँक नाही. अपघात झाला तर हाडांचे डॉक्टर नाही. महिलांच्या तपासणीसाठी स्त्री रोग तज्ञ उपलब्ध नाही. नेत्ररोग तपासणी साठी नेत्ररोग तज्ञ उपलब्ध नाही. स्वच्छता,वार्ड बॉय, ड्रेसर कर्मचारी उपलब्ध नाही, अशा अनेक समस्या या उपजिल्हा रुग्णालयात आहेत.
काहीही करा आजच्या आज या समस्या शासन दरबारी मांडा व ८ दिवसाच्या आत उपजिल्हा शासकीय रुग्णालय सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून सुरू करा. अन्यथा ८ दिवसाच्या नंतर भोंगळ कारभाराच्या विरोधात उपोषण करण्यासाठी बसणारं आहोत, अशी माहिती युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण यांनी दिला आहे. आंदोलन प्रसंगी तालुका प्रमुख ॲड.ज्ञानेश्वर बोरसे, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख नरेंद्र धुमाळ, विशाल भोई, शामराव पाटील, साहेबराव पाटील, संजय पाटील, शेख उस्मान शेख अब्दुल शेख, सईद शेख इब्राहिम शेख, अलीम शेख, प्रकाश सूर्यवंशी, जनार्दन पाटील, प्रशांत सुरवाडे, सुपडू माळी आदि शिवसैनिक उपस्थित होते.