मेहरूण ट्रॅक वरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील मेहरूण ट्रॅकजवळ अज्ञात चार जणांनी दुचाकीवर येवून वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थ्यांना चाकूने वार करून जखमी केले. तसेच, त्यांच्याजवळील महागडे मोबाईल जबरी हिसकावून पसार झाल्याची घटना घडली. दोघांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बुधवारी १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी हिमांशू शशिकांत कुटे (वय-२५) रा. महाबळ आणि त्याचा मित्र देवेश चव्हाण रा. जळगाव हे दोघे मंगळवारी ११ जुलै रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहरातील मेहरूण तलावाजवळील वॉकिंग ट्रॅकवरील बाकड्यावर बसलेले होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीएम ३२७८) ने आले. यातील एकाने चाकूने हिमांशू कुटे यांच्या हातावर व पायावर वार करून गंभीर जखमी केले.
त्यानंतर हिमांशू आणि त्याचा मित्र देवेश याचा देखील मोबाईल असा एकुण ३९ हजारांचा मुद्देमाल जबरी हिसकावून लांबविल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या हिमांशूला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बुधवारी १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता हिमांशूने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.