तहसीलदारांनी स्वीकारले निवेदन, पोलिसांचा चोख बंदोबस्त
भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील कजगाव येथील रस्त्याच्या कामासाठी रॉयल्टी भरून गौणखनिजांची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी दि.१३ रोजी कजगाव बसस्थानक चौकात रास्ता रोकोसह गावबंद आंदोलन करण्यात आले होते. प्रसंगी भडगावचे तहसीलदार मुकेश हिवाळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. भडगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र पाटील, फौजदार शेखर डोमाळे यांनी चोख बंदोबस्त लावला होता.
आंदोलनावेळी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच हाजी शे.शफी मण्यार व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कजगावच्या बसस्थानक चौकात झालेल्या या रस्तारोकोमुळे भडगाव चाळीसगाव मार्गावर वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. आंदोलन सुरू होताच काहि वेळात भडगाव पोलीस स्टेशनचे दोन अधिकारीसह आठ कर्मचारी आंदोलन स्थळी दाखल होत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. घोषणाबाजीने बसस्थानक चौक दणाणले होते.
कजगाव ग्रामपंचायत हद्दीत गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाले आहे. यासाठी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करुन निधी मंजूर केला. तसेच टेंडर सुद्धा मंजुर केले. परंतु या रस्त्यांसाठी गौण खनिज नसल्याने रस्त्यांचे कामे रखडलेले असुन रॉयल्टी भरून गौण खनिजाची परवानगी द्यावी असे निवेदन कजगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे यांना दिले. या निवेदनात म्हटले होते की शासकीय यंत्रणेने मौजे कजगाव येथील रस्ते विकसित करण्याकरीता मंजुरी दिलेली आहे.
सदरचे रस्ते विकसित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे काम दिले असुन काम करण्यासाठी कायदेशीर रॉयल्टीची रक्कम घेऊन मौजे कजगाव ग्रामपंचायत मालकीच्या जागेतुन गौण खनिजाची परवानगी द्यावी. कजगांव येथील गावातील अनेक रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे, सदरचे रस्ते विकसित करण्याकरिता निधी मंजुर होऊन टेंडर पास होऊन, संबंधित अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डर २० जुन रोजी कॉन्ट्रक्टर यांना दिलेली आहे परंतु आपल्या कार्यालयामार्फत गौणखनिज वाहतुक परवाना मिळत नसल्यामुळे गावातील रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.