यावल तालुक्यातील राजोरा फाट्याजवळ घटना
यावल (प्रतिनिधी) :- तालुक्यातील यावल-भुसावळ रस्त्यावरील राजोरा फाट्यानजीक अट्रावल गावातील एका ५५ वर्षीय इसमाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अट्रावल, ता.यावल येथील कमलाकर सखाराम महाजन (वय ५५) हे मंगळवार दि. २२ ऑक्टोबर रोजी दुचाकी (एम.एच.१९ बी. डब्ल्यू. ८०३१) द्वारे अट्रावल येथून भुसावळकडे जात असताना राजोरा फाटा येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहन चालकाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना तेथून उपचारार्थ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशन येथे शुभम महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.