जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील सुरेशदादा जैन नगर परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ता संजय वाघ (वय ४५, रा. सुरेशदादा जैन नगर) या आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २२ जून रोजी रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास मागील वादाच्या कारणावरून अश्विन प्रभाकर वाघ आणि कविता प्रभाकर वाघ यांनी पुन्हा वाद घातला.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर अश्विन वाघ याने मुक्ता वाघ यांच्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. या हल्ल्यात मुलाच्या डोळ्याजवळ व कपाळावर गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी मुक्ता वाघ यांनी २३ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अश्विन प्रभाकर वाघ आणि कविता प्रभाकर वाघ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. प्रकाश वाघ करीत आहेत.









