जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरातील चौबे शाळा परिसरातील बाजारात खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीचा सुमारे ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १० जून रोजी घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज सुभाष साळुंखे (वय ३५, रा. चौघुले प्लॉट, जळगाव) हे १० जून रोजी सायंकाळी चौबे शाळा परिसरातील बाजारात गेले होते. रात्री ७ ते ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या ताब्यातील एका कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेला. चोरीस गेलेल्या मोबाईलची किंमत सुमारे ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पंकज साळुंखे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अजय निकम करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.









