वार्ड क्र. १० मध्ये महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी
जळगाव ( प्रतिनिधी ) – महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) महापौर दीपमाला काळे यांनी वार्ड क्रमांक १० मधील विविध भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान खंडेराव नगर, मयूर कॉलनी आणि पिंप्राळा येथील गणपती नगर परिसरातील स्वच्छता, सांडपाणी निचरा, पथदिवे आणि इतर नागरी समस्यांचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.


स्वच्छता आणि दंडात्मक कारवाई : खंडेराव नगर परिसरातील खुले भूखंड त्वरित स्वच्छ करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. तसेच, खुल्या जागेवर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई (दंड आकारणे) करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
हायमास्ट लॅम्प दुरुस्ती : परिसरातील हायमास्ट लॅम्पची तातडीने दुरुस्ती करावी आणि गरज पडल्यास नवीन लॅम्प बसवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
गटारीचे साचलेले पाणी : मयूर कॉलनी भागातील एका खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर गटारीचे पाणी साचलेले निदर्शनास आल्यावर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना या पाण्याचा तात्काळ निचरा करण्याचे आदेश देत, गटारींच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी बांधकाम विभागाला सांगितले.
पथदिवे व वीज कंपनीचा समन्वय : पिंप्राळा येथील गणपती नगर भागात पथदिवे व्यवस्थित नसून एमएसईबीद्वारे खांबाला केबल पेटी लावण्यात आलेली नाही. यावर महापालिका व वीज कंपनीच्या समन्वयातून हे काम त्वरित पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्लास्टिक व कचरा हटाव : परिसरातील ओपन स्पेसमध्ये पडलेला कचरा आणि त्यात मोठ्या प्रमाणावर असलेला प्लास्टिकचा कचरा पाहून महापौरांनी तो तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी वार्ड क्रमांक १० चे नगरसेवक सुरेश सोनवणे, माधुरी अतुल बारी, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता मनोज वन्नेरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









