माजी खा. किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर आणि पोलिसांवर झालेली दगडफेक अत्यंत दुर्दैवी असून, काही समाजकंटक पुन्हा एकदा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. जळगाव येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

किनगाव येथील घटनेतील दोषींना तातडीने तडीपार करण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी किरीट सोमय्या यांनी केली.राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
विजयादशमीनिमित्त अनेक वर्षांनंतर पोलिसांकडून पथसंचलनाला परवानगी मिळाली होती. या प्रकरणी जळगाव पोलिसांनी तत्परता दाखवत ५७ जणांवर गुन्हे दाखल केले असून, १७ जणांना अटक केल्याबद्दल त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. आगामी काळात राज्यात समान नागरी कायदा लागू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या पत्रकार परिषदेला आमदार अमोल जावळे, महापौर दीपमाला काळे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा पदाधिकारी डॉ. केतकी पाटील, नगरसेवक अरविंद देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









