जळगाव (प्रतिनिधी) – शिरसोली येथे बारी समाज माध्यमिक उच्च व माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक सुनील भदाणे, ज्येष्ठ शिक्षक रामकृष्ण पाटील व अशोक बावस्कर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी रामकृष्ण पाटील यांनी या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा तसेच त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेतला. त्यांनी आंबेडकरांनी समाजातील शोषित-वंचित घटकांच्या उन्नतीसाठी केलेल्या संघर्षमय कार्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
यानंतर कांचन धांडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनीही आपल्या जिव्हाळ्याच्या भावना व्यक्त करत डॉ. आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रकांत कुमावत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा बारी व दीपक कुलकर्णी यांनी सुबकपणे पार पाडले. शेवटी मनीषा पायघन यांनी उपस्थितांचे आभार मानले.
मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. आंबेडकरांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, समता व बंधुत्व या तत्त्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयामध्ये उत्साहाचे वातावरण लाभले होते. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून अभिवादन केले आणि कार्यक्रमानंतर सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.









