
म्हसावद येथील रेल्वे गेटजवळ सायंकाळी घडली घटना; वाहनचालकाविरुद्ध कारवाईची मागणी
म्हसावद (प्रतिनिधी) :- येथील रेल्वे गेट बंद असताना ते तातडीने उघडण्याच्या मागणीवरून रेल्वे गेटमनला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत रेल्वे कर्मचारी प्रवीण रामलाल महे (रा. म्हसावद, ता. जळगाव) हे जखमी झाले असून, त्यांच्या अंगावरील शर्टही फाडण्यात आला.


मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे गेट नियमानुसार बंद असताना एका वाहनचालकाने गेट तात्काळ उघडण्याची मागणी केली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी नियमानुसार गेट उघडण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या संबंधित व्यक्तीने गेटमन प्रवीण महे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. झटापटीदरम्यान त्यांच्या अंगावरील शर्टही फाडण्यात आला.
या घटनेमुळे काही काळ रेल्वे गेट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी कर्मचाऱ्यावर उपचार करण्यात आले असून, या घटनेची माहिती संबंधित रेल्वे प्रशासन व पोलिसांना देण्यात आली आहे.
दरम्यान, रेल्वेच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत संताप व्यक्त होत असून, संबंधित वाहनचालकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रेल्वे कर्मचारी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.










