
टीओडी मीटरची उपयुक्त माहिती मिळून तक्रारीचे निवारण होणार
जळगाव परिमंडलातील सर्व उपविभागीय कार्यालयांत आयोजन
जळगाव : वीज ग्राहकांशी संवाद साधून स्मार्ट टीओडी मीटरबाबतचे गैरसमज दूर करून तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी (21 जुलै) जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महावितरणच्या सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये ग्राहक संवाद मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.


स्मार्ट टीओडी मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रतियुनिट 85 पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरत आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.
जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडलातील सर्व उपविभाग कार्यालयांत मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत ग्राहक संवाद मेळावे पार पडणार आहेत. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकरी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणार आहेत. तसेच स्मार्ट मीटर संदर्भात असलेल्या शंकेचे व वीज देयक तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
परिमंडलातील 6 लाख 83 हजार ग्राहकांकडे स्मार्ट मीटर : जळगाव परिमंडलात आतापर्यंत एकूण 6 लाख 83 हजार 374 वीज ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. यामध्ये जळगाव मंडलात 4 लाख 34 हजार 957, धुळे मंडलात 1 लाख 52 हजार 308 आणि नंदुरबार मंडलात 96 हजार 109 ग्राहकांचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर जळगाव परिमंडलात मोठ्या संख्येने वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास प्रतिसाद दिला आहे.
मेळाव्याशिवाय या ठिकाणी दाखल करता येणार तक्रारी : स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीजबिलांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे. ग्राहकांनी महावितरणचे संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲप तसेच 1912, 19120. 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर तक्रारी नोंदवाव्यात तसेच या संवाद मेळाव्याचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.










