नवीन पालक कार्यकारिणीची स्थापना; शैक्षणिक गुणवत्ता, सुरक्षितता व संगणकीय शिक्षणावर मान्यवरांचे मार्गदर्शन
शिरसोली ( प्रतिनिधी ) –शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी शिक्षक-पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सर्वांगीण विकास, सुरक्षितता आणि पालक-शिक्षक समन्वय या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी नवीन शैक्षणिक वर्षासाठी पालक कार्यकारिणीचीही स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष निलेशभाऊ खलसे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव सुरेशभाऊ अस्वार, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बारी, संचालक शशिकांत वाणी, अर्जुन काटोले, राजेश आंबटकर, संजय ताडे, अशोक काटोले, भास्कर बारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश (आर. एस.) आंबटकर उपस्थित होते. याशिवाय पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक जी. बी. काळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ. बी. टी. ठाकरे व डी. जी. कुलकर्णी यांनी केले. विद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व विविध उपक्रमांतील उल्लेखनीय प्रगतीचा अहवाल सी. एस. कुमावत यांनी सादर केला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक आर. के. पाटील यांनी पालक आणि शिक्षक यांच्यातील दुवा म्हणजे विद्यार्थी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दोघांचाही समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
मुख्याध्यापक आर. एस. आंबटकर यांनी आजचे युग हे संगणकीय युग असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. तसेच पालकांच्या सहभागातून शाळेची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. काही पालकांनी बाहेरगावाहून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न उपस्थित करून सूचना मांडल्या.
अध्यक्षीय समारोपात निलेशभाऊ खलसे यांनी कोणताही विद्यार्थी आर्थिक किंवा सामाजिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी संस्था कायम विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, बौद्धिक विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कांचन धांडे यांनी केले. शिक्षक-पालक सभेमुळे पालक व शाळा प्रशासन यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








