चोपडा तालुक्यातील घटना;आरोपी फरार
चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील धानोरा गावात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या विवाहितेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेच्या पतीच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान धानोरा गावातील शिवमंदिराजवळील परिसरात ही घटना घडली. पीडितेच्या पतीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला दारू पाजली आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला.
या प्रकरणी जितेंद्र भोई व गणेश भोई (दोघे रा. धानोरा, ता. चोपडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची तक्रार १८ जुलै २०२६ रोजी रात्री अडावद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून,या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.









