अॅग्रोवर्ल्डतर्फे शेतकरी, उद्योजकांचा पुरस्काराने सन्मान
जळगाव (प्रतिनिधी) :- जोपर्यंत आपण नवीन गोष्टी स्विकारत नाही, तोपर्यंत चांगली शेती होवू शकत नाही. विचारातून आणि नवीन स्विकारण्यातून क्रांती होत असते. अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून आपण असे नवतंत्रज्ञान मिळवू शकतो. अॅग्रोवर्ल्ड ही नुसती संस्था नसून शेतीसाठीची चळवळ आहे आणि आपण या चळवळीत सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले.
जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान होत असलेल्या अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या दुसर्या दिवशी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी केंद्र संचालक, शेतकरी गट आदींचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी खा. पाटील बोलत होते. श्रीराम उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील, प्लॅन्टो कृषी तंत्रचे निखिल चौधरी, मेट्रोजेनचे प्रियांक शहा, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, कृषी विभागाचे सेवानिवृत्त कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
खा. उन्मेष पाटील म्हणाले की, अॅग्रोवर्ल्ड हे शेतकर्यांना अधिकाधीक ज्ञान देवून त्यांच्या चेहर्यावर हास्य फुलविण्याचे काम करीत आहे. प्रदर्शनातून आपण काही ज्ञान घेतल्यास तुमचा उद्याचा दिवस नक्की बदलणार आहे. ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीची सांगड घालून शेतीतून आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.
शेतकर्यांनी स्वावलंबी झाले पाहिजे – श्रीराम पाटील
श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील म्हणाले की, शेतकर्यांनी आता स्वावलंबी झाले पाहिजे. आपला माल कसा विकता येईल, त्याची साठवणूक कशी करता येईल, त्याच्या विक्रीचे नियोजन कसे करता येईल, या गोष्टी शेतकर्यांनी शिकल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
या पुरस्कार्थींचा झाला सन्मान
कार्यक्रमात अॅग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी पुरस्काराने मनोज वायकोळे, भारती पाटील, सुनिता पाटील, राजश्री वानखेडे, सुरेश पाटील, सागर पाटील, नारायण सोनवणे, मयुरी पाटील, शंकर पाटील यांचा, अॅग्रोवर्ल्ड आदर्श कृषी उद्योजक पुरस्काराने माधव रणदिवे, गोविंदा सोनवणे, विशाल अग्रवाल, योगेश निकम, कल्पना बडगुजर, वैशाली देशमुख, वनिता खरे, दामिनी सरोदे, वंदना पाटील, प्रतिक कुमार, मंगेश पाटील, तुकाराम सोनवणे आणि सोनल वेलजाळी, मेट्रोजेनचे संचालक प्रियांक शहा, हरिकृष्णा पोथीना यांचा तर अॅग्रोवर्ल्ड आदर्श कृषी केंद्र संचालक म्हणून सागर अहिरे, संजय पाटील, गौरव काळे, राजीव जाजू, अॅग्रोवर्ल्ड कृषी ऋषी पुरस्काराने दत्तात्रय पाटील तर अॅग्रोवर्ल्ड आदर्श सहकारी पुरस्काराने राणी नाना राठोड आदींचा सत्कार करण्यात आला.