खा. उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी, परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने यश
जळगाव (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील मूळ रहिवासी तथा पावणेदोन वर्षांपासून मलेशियात व्यापारानिमित्त गेलेले व्यापारी जयकुमार रतनानी (वय ४०) यांचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. रतलानी कुटुंबीयांनी खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे आपबिती कथन केली. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून भारतीय दूतावासामार्फत पाठपुरावा केला. त्यामुळे मलेशियात गुन्हा दाखल होऊन तेथील पोलिसांनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती खा. उन्मेष पाटील यांनी “केसरीराज”शी बोलताना दिली आहे.
जयकुमार रतनानी पाचोरा येथील मूळ रहिवासी असले तरी त्यांनी काही वर्षे जळगाव येथे चॉकलेटचा कारखाना चालविला. त्यानंतर ते पावणेदोन वर्षांपूर्वी मलेशियात व्यापारासाठी गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी गेल्या २२ ऑक्टोबरला त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ‘मी कार्यक्रमात आहे, नंतर बोलतो’, असे संभाषण झाले होते. त्यानंतर मात्र त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. त्यांच्या पत्नी भाविका यांनी पती जयकुमार यांच्याशी बोलण्यासाठी अनोळखी दोन मोबाईल क्रमांकावरून फोन आले व त्यांनी रतनानी यांच्याशी बोलण्यासाठी बँक खात्यात पैसे टाकण्याचे सांगण्यात आल्याचे स्पष्ट केले व पतीचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे तपासाअंती ‘अवांग नारुलहदी’ असे मोबाईल करणाऱ्या व्यक्तीचे नाव निष्पन्न झाले आहे.
भाविका रतनानी यांनी संबंधित व्यक्तीशी फोनवर बोलणे झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. परंतु त्या बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर होत नसल्याने त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता संपर्कही झाला नाही. त्यामुळे भाविका रतनानी यांच्यासह कुटुंबीयांनी खासदार उन्मेष पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे कैफियत मांडली. खासदार पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे माहिती दिली. त्यांनी मलेशियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भारतीय उच्चायुक्त आयोगाच्या समुपदेशकांशी संपर्क साधून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर मलेशिया पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून तपास सुरु केला आहे. त्यामुळे संबंधित व्यापाऱ्याचा लवकरच शोध लागेल, अशी माहिती खा. उन्मेष पाटील यांनी “केसरीराज”शी बोलताना दिली आहे.