नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; अपघातानंतर मदत न करता पसार
नशिराबाद (प्रतिनिधी) :- भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ४५ वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजेच्या सुमारास नशिराबाद हायवेवरील नारायण लॉन्स परिसरात घडली. जखमी योगेश दिलीप खैरनार (वय ४५, व्यवसाय प्लंबर, रा. एकविरा देवीजवळ, जुने धुळे) हे आपल्या दुचाकीने जात असताना अज्ञात वाहनाने समोरून येत जोरदार धडक दिली.
या अपघातात खैरनार यांना गंभीर दुखापत झाली. धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालकाने थांबून मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठीही न नेताच चालक फरार झाला.
या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा क्रमांक १४६/२०२६ नोंदविण्यात आला आहे.









