शेळ्या सोडण्यास सांगितल्याच्या रागातून शेतात हाणामारी; सात जणांविरुद्ध गुन्हा


पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील घटना; लाकडी दांडा, चप्पल व चापटांनी मारहाण केल्याचा आरोप
पाचोरा : तालुक्यातील जारगाव शिवारातील शेतगट क्रमांक १३०/ब/१/ड/२१ येथे शेळ्या सोडण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला सात जणांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील युवराज पाटील (वय ५२, व्यवसाय शेती, रा. जारगाव, ता. पाचोरा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीला शेतामध्ये बांधलेल्या शेळ्या सोडण्यास सांगितले. याचा राग आल्याने संशयित आरोपींनी तेथे येऊन वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, खुशाल सुधाकर पाटील याने हातातील रॉडने पायावर व कमरेवर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुधाकर रघुनाथ पाटील याने लाकडी दांड्याने पायावर व पाठीवर मारहाण केली.
यावेळी संकेत गोकुळ धनगर आणि राहुल (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी फिर्यादीला पकडून ठेवले. तर रुपाली खुशाल पाटील हिने चिखलाने भरलेल्या चपलीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच संगीताबाई सुधाकर पाटील हिने चापटांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मारहाणीदरम्यान फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे ३३ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तोडून नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सखुबाई रघुनाथ पाटील हिने चप्पलने मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीच्या शेड व तारेच्या कंपाउंडचे सिमेंटचे पोल तोडून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
यावेळी आरोपींनी पुन्हा येथे पाय ठेवला तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे.
या प्रकरणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.५० वाजता पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३२४, १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२९(२), ३५१(२), ३५२ आणि १३१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात खुशाल सुधाकर पाटील, सुधाकर रघुनाथ पाटील, रुपाली खुशाल पाटील, संगीताबाई सुधाकर पाटील, सखुबाई रघुनाथ पाटील, संकेत गोकुळ धनगर आणि राहुल (कामगार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
गुन्ह्याचा पुढील तपास सफौ/२६९० संजय माधव काळे करीत आहेत.








