
दुचाकीस्वाराला खाली पाडून ५ लाखांची रोकड लुटली; चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – : मुक्ताईनगर ते घोडसगाव रोडवरील विश्रांती हॉटेलसमोर चार अज्ञात इसमांनी दुचाकीस्वाराला अडवून मारहाण करत त्याच्याकडील सुमारे ५ लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग जबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजेच्या पूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव शिवारात विश्रांती हॉटेलसमोर ही घटना घडली. एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून आलेल्या चार अनोळखी इसमांनी दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीच्या मोटारसायकलला मागून कट मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर संबंधित व्यक्तीला मारहाण करून त्यांच्याकडील अंदाजे ५ लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने हिसकावून चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेतील चारही आरोपी अद्याप अज्ञात असून, त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.
भररस्त्यात दुचाकीस्वाराला अडवून पाच लाखांची रोकड लुटण्याच्या या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








