राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची येवल्यात सभा
नाशिक (प्रतिनिधी) : माझा अंदाज सहसा कधी चुकत नाही, पण पक्षात बंडखोरी होत असल्य़ाचा अंदाज आला नाही. माझा अंदाज चुकला म्हणून तुमची माफी मागतो. पुन्हा तशी चूक करणार नाही, योग्य निकाल लावला जाईल, अशी ग्वाही पवारांनी यावेळी दिली. चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या दुरूस्त केल्या पाहिजेत, असे सांगून जनतेने पुरोगामी विचारांना साथ द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे केले.
शनिवारी ८ जुलै रोजी त्यांची येवल्यात सभा झाली. यावेळी ते बोलत होते. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा इशारादेखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाव न घेता दिला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांनी पहिल्यांदा नाशिक दौरा केला. शरद पवार म्हणाले की, आतापर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक संकटात काही सहकाऱ्यांनी साथ सोडली नाही. परंतु यावेळी काही सहकारी सोडून गेले. पण आज इथे काही कुणावरही टीका करायला आलेलो नाही. तर जनतेची माफी मागायला आलेलो आहे, असे त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट केले.