जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरात राहणाऱ्या बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थींनीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असतांना विद्यार्थींनीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिवार ८ जुलै रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पल्लवी सुरेंद्र भालेराव (वय-१७) रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव असे मृत विद्यार्थींनीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीत पल्लवी भालेराव ही आई, वडील आणि मोठा भावासह राहायला होती. नुकतेच तिने बारावी कॉमर्स मध्ये सिध्दीविनायक महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून पल्लवी ही कोणत्यातरी तणावात होती. सोमवारी ३ जुलै रोजी तिने घरात कुणीही नसतांना घरात गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. नातेवाईक व शेजारच्यांनी लगेच तिला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी ८ जुलै रोजी तिची प्रकृती अधिक खालावल्याने खासगी रूग्णालयातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. दुपारी तिच्यावर उपचार सुरू असतांना तिची प्राणज्योत मालविली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत पल्लवीच्या पश्चात आई अलका, वडील सुरेंद्र हरी भालेराव, मोठा भाऊ पवन असा परिवार आहे.