पावसाचे पाणी साचण्याच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश
जळगाव ( प्रतिनिधी ) –आहुजा नगर परिसरातील मनुदेवी हाउसिंग सोसायटीमध्ये असलेल्या ओपन स्पेस संदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (दि. ९ जून) महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


वारंवार तक्रारी करूनही झाले होते दुर्लक्ष
मनुदेवी हाउसिंग सोसायटी परिसरातील या ओपन स्पेसची लेव्हल खाली असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या मूलभूत सुविधेबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र प्रशासनाकडून त्याकडे गंभीर दुर्लक्ष करण्यात आले होते. अखेर त्रस्त नागरिकांनी या समस्येबाबत थेट महापौर दीपमाला काळे यांच्याकडे दाद मागितली होती.
वेस्ट मटेरियल टाकून लेव्हल करण्याचे निर्देश
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौरांनी मंगळवारी या परिसराला भेट दिली. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर, या ठिकाणी पावसाचे पाणी जमा होते आणि ते वाहून जाण्यासाठी जागा नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर तातडीने तोडगा म्हणून, “या ओपन स्पेसमध्ये वेस्ट मटेरियल (भराव) टाकून लेव्हल करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
“आगामी पावसाळ्यात येथील नागरिकांना पाण्याचा कोणताही त्रास होणार नाही, याची महापालिका प्रशासनाने पूर्ण काळजी घ्यावी.”
— दीपमाला काळे, महापौर
या पाहणी दौऱ्यादरम्यान महानगरपालिकेचे अभियंता विशाल सुर्वे, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर यांच्यासह महापालिकेचे इतर संबंधित अधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.








