दोन वर्षांपासून देत होता गुंगारा ;आरोपी राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन
पाचोरा ( प्रतिनिधी ) – राजस्थानमधील तब्बल दोन कोटी रुपयांच्या अफू मादक पदार्थ प्रकरणातील फरार आरोपीला पाचोरा पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाईत अटक करून मोठे यश संपादन केले आहे. मागील दोन वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी पाचोरा शहरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून त्याला जेरबंद केले.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील सरणा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११/२०२४ अंतर्गत एनडीपीएस कायदा कलम ८, १५ तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम २०१ अन्वये दाखल गुन्ह्यात गोविंद शंभुनाथ (वय २७, रा. बनका खेडा, ता. कोठली, जि. भिलवाडा, राजस्थान) हा मागील दोन वर्षांपासून फरार होता. राजस्थान पोलीस त्याचा शोध घेत असताना तो पाचोरा परिसरात लपून राहत असल्याची माहिती समोर आली.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, सहाय्यक फौजदार विलास पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील आणि गणेश कुवर यांनी अत्यंत गोपनीयतेने तपास सुरू केला. आरोपीच्या हालचालींवर अनेक दिवस बारकाईने नजर ठेवून त्याचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. पोलिसांच्या हालचालींचा संशय येऊ न देता योग्य संधी साधून सापळा रचण्यात आला आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन
आरोपीविरुद्ध अजमेर आणि चित्तोडगड परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. अटकेनंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
संघटित गुन्हेगारीविरोधातील महत्त्वाची कारवाई
ही कारवाई केवळ एका फरार आरोपीच्या अटकेपुरती मर्यादित नसून मादक पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील आणि संघटित गुन्हेगारीविरोधातील महत्त्वाची मोहीम मानली जात आहे. पाचोरा पोलिसांनी दाखविलेली सतर्कता, गुप्त माहितीचे अचूक विश्लेषण आणि योग्य वेळी केलेली अंमलबजावणी यामुळे ही कारवाई यशस्वी ठरली.
या यशस्वी मोहिमेबद्दल राजस्थान पोलीस दलाने पाचोरा पोलिसांचे विशेष कौतुक केले असून स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या दक्षतेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.









