शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,रुग्णालयातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील १८ वर्षीय तरुणाला सेरेब्रल पाल्सी हा आजार असताना डाव्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. अशा अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांचे वैद्यकीय कौशल्य पणाला लावून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करीत उपचार केले. वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.
जळगाव शहरात मध्यवर्ती भागात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला जन्मतः सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेले आहे. त्याला मुक्कामार लागला. अनेक खाजगी दवाखाने फिरून आल्यावर अखेर त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हाडे ठिसूळ असल्यामुळे तपासणी केल्यावर त्याच्या डाव्या पायाचे हाड फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्याच्यावर अस्थिव्यंगोपचार विभागाने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
मात्र सेरेब्रल पाल्सी असल्याने रुग्णाला कम्बर जन्मतः वाकून असल्यामुळे शस्त्रक्रिया करताना त्याला भूल द्यायला अडचण येत होती. अशा रुग्णाला शस्त्रक्रिया करताना रक्तस्राव होणे, हाडांचा चुरा होणे असे होऊ शकते. मात्र अस्थिरोग विभागाने वैद्यकीय कौशल्य पणाला लाविले. सेरेब्रल पाल्सी रुग्णाची हाडे वाकडी असतात, तरीही कुशलता दाखवीत डॉक्टरांनी हि गुंतागुंतीची यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया केली.
तरीही बधिरीकरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. संदीप पटेल यांनी त्याला भूल देण्यात यश मिळविले. त्यानंतर अस्थिरोग विभागाच्या तज्ज्ञांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. रुग्णावर उपचार करण्याकामी अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. जोतीकुमार बागुल, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. अंकित गावरी, डॉ. असिफ कुरेशी, डॉ. गोपाळ डव्हळे, डॉ. प्रणव समृतवार, डॉ. सचिन वाहेकर यांच्यासह इन्चार्ज परिचारिका रत्नप्रभा पालीवाल, निला जोशी यांनी परिश्रम घेतले.