जिल्हा परिषदेचा राज्यात सातवा क्रमांक
जळगाव (प्रतिनिधी) – शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे प्राथमिक शिक्षणाचे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स नुकतेच जाहीर करण्यात आले. यात जळगाव जिल्ह्याचा राज्यात सातवा क्रमांक आला आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासंदर्भात जळगाव जिल्हा परिषदेने केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल मंगळवार दि.११ रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेमध्ये येत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचा विशेष सत्कार केला.
शालेय शैक्षणिक व्यवस्थेचा कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा २०२०-२१ आणि २१ – २२ या वर्षाचा एकत्रित अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने जारी केला आहे. यात ३२ जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा सातवा क्रमांक लागला आहे. जळगाव जिल्ह्यात शाळांमध्ये १६ कलमी कार्यक्रमामुळे भौतिक सुधारणा झाली असून निपूनच्या चार चाचण्यांमुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली आहे. या संदर्भात या अहवालातील मूल्यांकन करताना ८३ निर्देशांक ठरवण्यात आले होते. त्यांचे मूल्यांकन एकूण सहाशे गुणांमध्ये केले आहे. या ८३ निर्देशांकाची मिळालेले एकूण परिणाम वर्गातून केल्या जाणाऱ्या अध्यापनाचा परिणाम पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण डिजिटल अध्ययन आणि प्रशासन प्रक्रिया या सहा गटांमध्ये विभागणी केली गेली आहे.
या एकूण मूल्यांकनात जळगाव जिल्ह्याचा राज्यात सातवा क्रमांक लागला आहे. मंगळवारी खासदार उन्मेष पाटील यांनी जिल्हा परिषदेत येऊन या कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा विशेष सत्कार केला. यावेळी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांचे सह इतर उपस्थित होते.