भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे स्टेशन जवळील आऊटर जवळ धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने जखमी झालेल्या एका प्रौढाचा जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. या प्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अब्दुल शकील अब्दुल रफी (वय-५२, रा. मशिद जवळ, भडशिपनी ता. कारंजा जि. वाशिम) असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे. अब्दुल शकील हे रेल्वेतून प्रवास करत असताना शनिवारी दि. ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकाजवळील आउटर जवळ धावत्या रेल्वेतून ते खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले.(केसीएन)या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ पोलीस ठाण्याचे रेल्वे पोलीस कर्मचारी नागेश दंडी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अब्दुल शकील यांना जखमी अवस्थेत तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्यावर उपचार सुरू असताना सकाळी ९ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेबाबत भुसावळ रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नागेश दंडी हे करीत आहे.