नशिराबाद रस्त्यावरील प्रकार
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील मेरी माता चर्चजवळ एका वकिलाच्या गळ्यातील १ लाख १० हजारांची सोन्याची चैन अज्ञात व्यक्तीने बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याची घटना शुक्रवार दि. ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी ६ जुलै रोजी नशिराबाद पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र आता पुरुषांच्याही गळ्यातीलही सोनसाखळी चोरीला गेल्यामुळे खळबळ उडाली आहे.
प्रकाश रामदास मोझे-पाटील (वय ६३, रा. शिवकॉलनी, भुसावळ) हे वकीली करून ते आपला उदरनिर्वाह करतात. नशिराबाद ते भुसावळ रोडवरील मेरीमाता चर्च जवळील रोडने ते जात असतांना अज्ञात व्यक्ती हा त्यांच्याजवळ आला व त्याने प्रकाश मोझे पाटील यांच्या गळ्यातील १ लाख १० हजार रूपये किंमतीची २० ग्रॅम सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून चोरून पसार झाला. हा प्रकार शुक्रवारी ५ जुलै रोजी रात्री ११ वाजता घडला. त्यानंतर प्रकाश मोझे पाटील यांनी नशीराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी ६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घायतड हे करीत आहे.