भुसावळ येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील श्रीराम नगर भागातील रहिवासी असलेल्या व फोटोग्राफीचा व्यवसाय करणार्या 18 वर्षीय युवकाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजता उघडकीस आली. चिराग दीपक वारके (18) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिराग या तरुणाने वडिलांकडे पैशांची मागणी केली होती मात्र ती पूर्ण न झाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. शनिवारी रात्रीपासून चिराग बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना रविवारी सकाळी हा प्रकार समोर आला. या घटनेमुळे श्रीराम नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोबाईलचा हप्ता भरण्यासाठी पैसे न दिल्याने उचलले टोकाचे पाऊल
शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी असलेले दीपक वारके यांचा मुलगा चिराग (18) याने वडीलांकडे पैशांसाठी तगादा लावला होता व पैसे न दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती मात्र पैसे न मिळाल्याने चिरागने काशी विश्वश्वर मंदीराजवळून गेलेल्या रेल्वे लाईनीवर जात दोन्ही रुळांच्या मध्ये झोपून जात आत्महत्या केली. धावत्या रेल्वेने चिरडल्याने धडापासून मान वेगळी झाल्यानंतर अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी मयताची ओळख पटली.
शहर पोलिसांनी घेतली धाव
भुसावळ शहर पोलिीस ठाण्याचे उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, दीपक शेरवे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. केबल व्यावसायीक दीपक वारके यांना चिराग हा एकूलता एक मुलगा असल्याने मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.