जळगाव सुप्रीम कॉलनी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात असणाऱ्या मंदिरच्या ओटा बांधकामावरून वाद झाल्यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात ८ ते १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास दगडफेक होऊन यात सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली आहे.
याबाबत पवन रमेश पाटील (वय-२२वर्ष, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सुप्रीम कॉलनी परिसरात ओंकारेश्वर महादेव नावाचे मंदिर मागील २५ ते ३० वर्षापासुन आहे. सदर मंदिराचा ओटा हा गेल्या पावसाळ्यात तुटला होता. आता श्रावण महिना येत असल्याने मंदिरासमोरील ओटा दुरुस्ती करण्याकरीता फिर्यादी तसेच सुप्रीम कॉलनी परिसरातील मित्र अशांनी मंदिराचे ओट्याचे काम करण्याचे ठरविले होते. रविवारी दि. ०९ रोजी सकाळी १० वा. फिर्यादी, श्रीकांतसिंग, रविंद्र राठोड, दिवाकर मिसाळ, देवेश पाटील, अजय शेळके, विकास खोटे, गौरव जाधव, अक्षय फरकाडे, निलेश मिसाळ, संदिप चव्हाण, दिपक कृष्णा घुगे, सजन सुभाष राठोड, संतोष मोहन चव्हाण, गोपी सुपड़ राठोड अशांनी कामाला सुरुवात केली. दुपारी ०३.०० ते ०३.३० वा. चे दरम्यान फिर्यादी व त्याचे वरील सर्व मित्र मंदिराचे ओट्याचे बांधकाम करीत होते.
अचानक आजु बाजुच्या परिसरातील सुमारे ४० ते ५० लोक हे तेथे आले म्हणाले की, तुम्ही येथे ओटा का बांधत आहात असे बोलून हुज्जत घालून भांडण करु लागले. म्हणुन दिपक कृष्णा घुगे व फिर्यादी त्यांचे व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. याचा त्यांना राग आल्याने अज्ञात लोकांनी दगड व लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आज यांना जिवंत सोडू नका असे म्हणून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांवर मोठमोठे दगड फेकण्यास सुरुवात केली. दगड फिर्यादी पवन पाटील, श्रीकांतसिंग माधवसिंग चौधरी, सजन सुभाष राठोड, संतोष मोहन चव्हाण, दिपक कृष्णा घुगे, रविंद्र संतोष राठोड, गोपी सुपडु राठोड अशांना देखील लागुन दुखापत झालेली आहे. तेथून फिर्यादी व त्यांचे मित्र हे तेथून पळत सुटले व पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.