पाचोरा ( प्रतिनिधी ) – लोहटार येथील वृद्ध दाम्पत्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना १० जुलै रोजी उघडकीस आली. मयत वृद्ध दाम्पत्यांची लोहटार येथुन एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली.
लोहटार ता. पाचोरा येथील एस. टी. महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (वय – ७८) यांना सुरुवाती पासूनच अध्यात्माची आवड होती. महामंडळातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ईश्वर पाटील व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (वय – ७२) हे नियमित देवपूजा करुन अध्यात्मिक मार्गावर चालत असतांनाच ८ जुलै रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिस स्टेशनचा टेलिफोन वाजतो.. समोरुन ईश्वर पाटील बोलतात.. मी व माझी पत्नी या संसाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. आमच्या आत्महत्येस कोणासही कारणीभूत धरु नये. अशी माहिती पोलिस स्टेशनमध्ये देतातच. पोलिसांनी तात्काळ लोहटार गाठले असता ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले होते.
वृद्ध दाम्पत्यांना तात्काळीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर वृद्ध दाम्पत्यास वाचविण्यास यश आले होते. मात्र नियतीला ते मंजूर नव्हते. आणि तो दिवस अखेर उगविलाच १० जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्रकृती अचानक खालावली व काही क्षणातच प्रमिलाबाई पाटील यांचे दु:खद निधन झाले. या घटनेस काही तास उलटत नाही तोच सकाळी ८ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांचे देखील दु:खद निधन झाले.