आगामी दोन दिवस धोक्याचे, सतर्कतेचा इशारा
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात बुधवारी १९ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळलेला आहे. या पावसामुळे काही तालुक्यांमध्ये पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान विभागाने जिल्ह्यात रेड अलर्ट रात्री ९ वाजता जाहीर केला आहे. उद्या दि. २० व २१ जुलै रोजी नदीकाठच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
जिल्हयात १९ रोजी प्रादेशिक हवामान विभागाकडून जळगाव जिल्हयात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जळगाव जिल्हयात आज सकाळी ९ वाजेपासून दुपारी १ वाजेपावेतो मोठयाप्रमाणात पाऊस झालेला आहे. तसेच जळगाव जिल्हयातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आलेले आहे. तापी नदीकाठावरील गावात पुरपरिस्थितीचा धोका निर्माण झालेला आहे. त्यानुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नियंत्रण कक्षातर्फे नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचे प्रमाणात वाढ होऊन गावात पुरपरिस्थितीचा दि. २० व २१ या कालावधीत धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनातर्फे दिलेल्या सुचनांचे पालन करावे व खालीलप्रमाणे खबरदारी घ्यावी. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तसेच नदीकाठच्या नागरिकांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.नाले, ओढे, काठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून दूर जावे. पुराचे पाणी पुलावरुन वाहत असल्यास पुल ओलांडू नये.
पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. 5. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकेदायक इमारतींमध्ये आश्रय घेवू नये.पूरग्रस्त भागातून वाहने चालवू नये. जमिनीखालून जाणाऱ्या विदयुत तारांपासून सावध रहावे. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्न पदार्थ खावू नये. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. पिण्याचे पाणी उकळून प्यावे व जेवणाआधी हात स्वच्छ धुवून घ्यावे.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.घाट. डोंगर रस्ते अरुंद रस्ते, दरी खोरे येथून प्रवास करणे टाळावे. धरण, नदी क्षेत्रामध्ये, धबधबे डोंगर माथा, घाट कपारी, जंगल रस्ते येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खरबदारी घ्यावी. धोकेदायक ठिकाणी जाणे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षास संपर्क करावा. जिल्हा नियंत्रण कक्ष : टोल फ्री १०७७, ०२५७-२२१७१९३, २२२३१८०.