एरंडोल पोलीस ठाण्यात राडा
एरंडोल (प्रतिनिधी):- पोलीस ठाण्यात घुसून गोंधळ घालणे आणि कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदारांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना एरंडोल पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान राघव अहिरे (वय ३२, रा. केवडीपुरा, एरंडोल, ह.मु. उमरदे ता. एरंडोल) याने १८ एप्रिल रोजी रात्री ९:१५ वाजेच्या सुमारास हा राडा केला. पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरी कक्षात पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश दिगंबर पाटील आणि मुकेश आमोदकर हे शासकीय काम करत असताना समाधान अहिरे हातामध्ये लोखंडी कोयता घेऊन त्याठिकाणी आला. “मी दिलेल्या केस मधील आरोपींना अद्याप अटक का केली नाही?” असा जाब विचारत त्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
संतापलेल्या समाधानने हातातील कोयत्याने पोलीस ठाण्यातील भिंतीवर असलेल्या टीव्हीच्या वायरवर वार केला, ज्यामुळे टीव्ही बंद पडला. त्यानंतर त्याने सीसीटीएनएस प्रणालीच्या मॉनिटरवर कोयता मारून नुकसान केले. इतक्यावरच न थांबता त्याने कर्तव्यावर असलेल्या दिनेश पाटील आणि मुकेश आमोदकर यांच्या अंगावर “तुम्हाला जिवंत सोडत नाही” असे म्हणत कोयता घेऊन धावून गेला. सुदैवाने या हल्ल्यातून पोलीस कर्मचारी बचावले.
या घटनेमुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (अमळनेर विभाग), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि एरंडोलचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली.









