आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

आरोग्य विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत तालुकानिहाय कामकाजाचा आढावा
जळगाव, : जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रलंबित कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत. आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
जिल्हा परिषद जळगाव येथील श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध आरोग्य योजनांची तालुकानिहाय प्रगती, उद्दिष्टपूर्ती आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
विविध आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा
बैठकीत NQAS, RBSK, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NCD), HPV लसीकरण, १०० दिवस अभियान, ‘तिशीचा पल्ला – तपासणी अन् सल्ला’, ‘माझं गाव – आरोग्य संपन्न गाव’ अभियान, आयुष्मान कार्ड आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) यांसह विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
NCD कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील पात्र नागरिकांची नियमित तपासणी करण्यासोबतच संबंधित रजिस्टर व नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. बाह्यरुग्ण विभागात (OPD) येणाऱ्या रुग्णांची आवश्यक तपासणी करून त्याची नोंद करावी, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा नियमित पाठपुरावा करावा आणि आवश्यकतेनुसार रुग्णांना संदर्भ सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
आरोग्य संस्थांमधील सेवा व उपस्थितीबाबत दक्षता घ्या
दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्हा दौऱ्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांच्या पूर्ततेचाही यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक उपस्थिती नियमित असावी. प्रत्येक रुग्णाला वेळेत तपासणी, योग्य उपचार आणि आवश्यक संदर्भ सेवा मिळतील, याची संबंधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य संस्थांना नियमित भेटी देऊन तेथील कामकाज, अभिलेखे आणि विविध रजिस्टरची तपासणी करावी. आरोग्य योजनांच्या प्रगतीचे सातत्याने परीक्षण करून उद्दिष्टपूर्तीतील त्रुटी दूर कराव्यात. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य व महिला-बालविकास विभागात समन्वयावर भर
माता, बालके आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग आणि महिला व बाल विकास विभागाने समन्वयाने काम करावे. विविध आरोग्य अभियानांची उद्दिष्टपूर्ती करताना लाभार्थ्यांना दर्जेदार सेवा मिळतील, याला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
यावेळीमाहिला बालविकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे,प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रमेश धापते, प्रभारी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक वाणी, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विवेक सावटे, डॉ. दीपक जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पंकज शिंपी, महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुकास्तरीय एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) अधिकारी उपस्थित होते.









