प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा

जळगाव शहरात ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ मध्ये दीपमाला काळे यांची पाहणी
जळगाव (प्रतिनिधी) : ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) महापौर दीपमाला काळे यांनी वार्ड क्रमांक १२ मधील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कचरा उचलण्याचे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
यावेळी स्थानिक नगरसेवक नितीन बरडे, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे, अनिल अडकमोल यांच्यासह महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले, अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर, बांधकाम अभियंता मनोज वनेरे यांच्यासह पाणीपुरवठा, आरोग्य, विद्युत, बांधकाम आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्डामध्ये अनेक ठिकाणी बिव्हिजीचे वाहन बंद असल्याने कचरा साठून राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रभागातील सफाई मोहिमेसाठी आज काही डंपर, दोन जेसीबी आणि ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण भागातील कचरा उचलण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या. तसेच, महामार्गालगत शानबाग हॉलजवळ साचलेला कचऱ्याचा मुख्य स्पॉट तात्काळ बंद करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.
याशिवाय, रात्रीच्या वेळी अनेक पथदिवे बंद राहत असल्याच्या तक्रारींवरही त्यांनी दखल घेतली. रात्री जाऊन सर्व पथदिवे तपासणी करा आणि आवश्यकता असेल तेथे तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. पाहणीदरम्यान साने गुरुजी कॉलनी परिसरातील एका अनधिकृत बांधकामाबाबत नागरिकांनी महापौरांकडे गाऱ्हाणे मांडले. या अनधिकृत बांधकामामुळे परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेणेही मुश्किल झाले असून नागरिकांची घुसमट होत असल्याची तक्रार त्यांनी केली. या बाबीची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी तत्काळ बांधकाम विभागाला या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
तसेच, प्रभागातील सर्व मोकळ्या प्लॉटमधील साचलेला कचरा व घाण जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे साफ करून घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.









