जळगाव एलसीबीची मोठी कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव जिल्ह्यात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली असून, चोपडा तालुक्यातील उमर्टी गावाकडून येणाऱ्या दोन तरुणांना गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह रंगेहात अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, उमर्टी बाजूकडून कृष्णापूर ते मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन तरुण मोटारसायकलने गावठी पिस्तूल घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून काळया रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. MH-19-S-9450) अडवली.
अटक केलेले संशयित राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा), गणपत प्रभाकर कीर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) त्यांच्याकडून १ गावठी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि २ मोबाईल फोन असा एकूण ६९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिनवाडे, दिपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने केली आहे.









