जळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई
नशिराबाद (प्रतिनिधी):- नशिराबाद गावात बस स्टॅण्ड परिसरात गावठी कट्टा बाळगून दहशत माजवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद बस स्टॅण्ड परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन हा सराईत आरोपी स्वतःकडे कट्टा बाळगून दहशत निर्माण करत असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना १९ एप्रिल २०२६ रोजी मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून सपोनि नारखेडे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून रात्री ७:३० वाजेच्या सुमारास कमलाकर महाजन याच्यावर छापा टाकून त्याला जागीच पकडले.
कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. वरची अळी, नशिराबाद, ता. जि. जळगाव) या संशयित आरोपीच्या ताब्यातून एक लोखंडी चंदेरी रंगाचा आणि काळ्या रंगाची प्लास्टिकची मूठ असलेला गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ भाग) केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक हरेश पाटील, चंद्रकांत पाटील, गुणवंत देशमुख, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, सागर बिडे, प्रवीण लोहार आणि समीर सैय्यद यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.









