जळगावचा मुंबईत गौरव
जळगाव (प्रतिनिधी) :- मुंबई येथील दादर येथील अमर हिंद मंडळ या प्रतिष्ठित संस्थेतर्फे देण्यात येणारा ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ हा राज्यस्तरीय सन्मान जळगाव येथील केशवस्मृती प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात आला.

या सोहळ्यात कोकुयु कॅम्लिनचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्रीराम दांडेकर यांच्या हस्ते संस्थेला सन्मानचिन्ह, मानपत्र व रु. १,००,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातील ९२ संस्थांमधून उत्कृष्ट कार्याच्या आधारे निवड होऊन केवळ पाच संस्थांमध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानचा समावेश झाला असून, हा जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
निःस्वार्थ सेवा, सामूहिकता आणि सातत्य या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धती, समाजातील नेमक्या गरजा ओळखून त्यावर कार्य करणे तसेच अधिकाधिक लोकांना जोडत नवीन नेतृत्व घडविण्याच्या दिशेने संस्थेने केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेच्या वतीने सचिव दिलीप चोपडा, सौ. मनीषा खडके, प्रवीण देशमुख, भानुदास येवलेकर व सागर येवले उपस्थित होते.
केशवस्मृती प्रतिष्ठानच्या या यशाबद्दल जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे









