बेकायदा मुरूम वाहतुकीवर वरणगाव पोलिसांची कारवाई; २० लाखांचा डंपर व मुरूम जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ | प्रतिनिधी : बेकायदा गौण खनिज वाहतुकीविरोधात वरणगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत परवानगीशिवाय मुरूम वाहतूक करणारा डंपर जप्त केला. या कारवाईत ३ ब्रास मुरूम आणि १० चाकी डंपर असा ₹२० लाख ६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तळवेल गावाच्या हद्दीबाहेर कमानीजवळ पोलिसांनी संशयित डंपरची तपासणी केली. तपासणीदरम्यान अशोक लेलँड कंपनीचा एमएच-१९ सीएक्स-६७११ क्रमांकाचा १० चाकी डंपर कोणतीही वैध परवानगी नसताना ३ ब्रास अवैध मुरूम वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी सतीश गोपाळ कोळी (वय २२, रा. ओझरखेडा, ता. भुसावळ) या चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून ३ ब्रास मुरूम (किंमत ₹६,०००) आणि ₹२० लाख किमतीचा अशोक लेलँड डंपर असा एकूण ₹२०,०६,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी तलाठी रेणुका रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९८/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर तुकाराम शिंदे करीत असून, सपोनि अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. बेकायदा गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.









