कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत मागील भरपाई देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे बैठकीत दिले.
अल्पबचत भवन येथे कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपसंचालक चंद्रकांत पाटील,आत्माचे कृषी उपसंचालक पांडुरंग साळवे, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कर्ज व अनुदान मिळवून देण्यासाठी बॅंका व शेतकऱ्यांचा संयुक्त मेळावा घेण्यात यावा. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर मेळावा आयोजित करण्यात यावा. या मेळाव्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या लाभार्थ्यांना ही सहभागी करून घेण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात जिल्ह्यात कमीत कमी ५०० लाभार्थ्यांना लाभ पोहचला पाहिजे.
कृषी उत्पादनापासून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. पीक उत्पादनाच्या खपासाठी मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात यावा. असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले . यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते तृणधान्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.