जळगावातील चित्रा चौक परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील चित्रा चौकापुढे कोंबडी बाजार चौक परिसरात रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ काढून, छेडखानी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला महिलेसह नागरिकांनी जोरदार चोप दिल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंबडी बाजार भागातील खंडवा कटलरी या दुकानात आरीफ खाटीक (वय – ३१) हा तरुण कामाला आहे. गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास दुकानाच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून एक महिला आपल्या मैत्रिणीसोबत जात असताना, आरीफ खाटीक याने व्हिडीओ केला असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने दिलेल्या माहितीनुसार तरुणाने व्हिडीओ केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने संबधित तरुणाला विचारणा केली. त्या तरुणाने व्हिडीओ करत नसल्याचे सांगितले.
मात्र, फोन तपासला असताना, डीलीट केलेल्या फंक्शनमध्ये हा व्हिडीओ आढळून आला. त्यानंतर त्या तरुणाने महिलेशी अरेरावी केली. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संबंधित तरुणाला चांगलेच बदडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला अटक करण्यात आली आहे.